मुरुड-जंजिऱ्याचा किल्ला हा रायगड जिल्ह्यातील मुरुड गावाच्या समुद्रकिनाऱ्यापासून थोड्या अंतरावर समुद्रात उभा असलेला एक अजिंक्य किल्ला आहे. समुद्राच्या लाटांशी लढा देत शतकानुशतके उभा असलेला हा किल्ला आपल्या भव्य वास्तुकलेसाठी आणि समृद्ध इतिहासासाठी प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे, कित्येक आक्रमणं होऊनही हा किल्ला कधीही जिंकला गेला नाही. ‘मुरुड’ हा मराठी शब्द आणि ‘जझीरा’ हा अरबी शब्द (अर्थ: बेट) यांच्या संयोगातून ‘मुरुड-जंजिऱ्या’ हे नाव पडले आहे.
मुंबईपासून सुमारे १६५ किलोमीटर दक्षिणेला, मुरूड बंदराशेजारील अंडाकृती खडकावर उभा असलेला जंजिरा किल्ला भारतातील सर्वात भक्कम समुद्री किल्ल्यांपैकी एक मानला जातो. जंजिरा हे नाव अरबी शब्द जझिरा (म्हणजे बेट) यावरून आले आहे.
हा किल्ला फक्त राजापुरी घाटावरून होड्यांनी गाठता येतो. किल्ल्याचा मुख्य दरवाजा राजापुरीकडे तोंड करून आहे, पण तो अगदी जवळ गेल्यावरच दिसतो. समुद्राच्या बाजूला पळवाट म्हणून एक छोटा दरवाजा आहे.
अजिंक्य किल्ला:
सिद्दींच्या ताब्यातील मुरुड-जंजिऱ्याने पोर्तुगीज, इंग्रज आणि मराठा अशा अनेक सामर्थ्यवान सैन्यांच्या हल्ल्यांना तोंड दिले. शिवाजी महाराज आणि संभाजी राजे यांच्यासह अनेकांनी हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी सिद्दींनी त्याचे यशस्वी रक्षण केले. त्यामुळेच हा किल्ला खऱ्या अर्थाने अजिंक्य ठरला.
वास्तुकलेची वैशिष्ट्ये:-
भक्कम तटबंदी: अंडाकृती आकाराचा हा किल्ला सुमारे 40 फूट उंच अशा प्रचंड भिंतींनी वेढलेला आहे. त्याची तटबंदी पाहूनच त्याची अजिंक्य ताकद जाणवते.
मनोरे आणि तोफा: किल्ल्यात एकूण 26 अखंड तोफांचे मनोरे आहेत. पूर्वी येथे स्थानिक तसेच युरोपीय उत्पत्तीच्या तोफा ठेवण्यात आल्या होत्या. त्यातील काही प्रचंड पंचधातूंच्या तोफा, जसे कलाल बंगडी, आजही पाहायला मिळतात. किल्ल्यात अजूनही तब्बल १९ गोल बुरुज मजबूत अवस्थेत आहेत. बुरुजांवर देशी-विदेशी असे गंजलेले तोफा आजही पडलेल्या दिसतात.
महत्त्वाची बांधकामे:
किल्ल्यात प्रवेश केला की आत तुम्हाला राजवाड्याचे अवशेष, प्रार्थनेसाठीची मशिद आणि गोड्या पाण्याच्या टाक्या दिसतात. या टाक्यांमुळे किल्ल्यातील लोकांना वर्षभर पिण्याच्या पाण्याची सोय होत असे. आज किल्ला अवशेष स्वरूपात उभा असला तरी त्याच्या सुवर्णकाळात येथे राजवाडे, सरदारांची निवासस्थाने आणि सर्व सोयीसुविधा उपलब्ध होत्या.
मुख्य दरवाज्याजवळील भिंतीवर कोरलेली एक वेगळी शिल्पाकृती पाहायला मिळते — त्यात वाघासारखा प्राणी हत्तीवर झडप घालताना दाखवला आहे. या शिल्पाचा नेमका अर्थ आजही स्पष्ट झालेला नाही, मात्र अशा शिल्पकला महाराष्ट्रातील इतर अनेक किल्ल्यांवरही आढळते.
मुरुड–जंजिराकिल्ल्याचाइतिहास:-
मुरुड-जंजिरा किल्ला हा मराठा, मुघल आणि पोर्तुगीज यांसारख्या बलाढ्य साम्राज्यांच्या सततच्या हल्ल्यांना तोंड देत, सिद्दी राजवटीच्या खंबीर प्रतिकारासाठी ओळखला जातो. अनेक शतकांपर्यंत तो अभेद्य राहिला आणि अजिंक्य बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध झाला.
सुरुवातीचेदिवसआणिबांधकाम:-
कोळी बांधवांचा किल्ला (१५ वे शतक): सुरुवातीला स्थानिक कोळी बांधवांनी अरबी समुद्रातील बेटावर चाच्यांपासून संरक्षणासाठी लाकडी किल्ला उभारला होता.
फसवणुकीने ताबा: अहमदनगरच्या निजामशाहीचा सेनापती पीरम खान याने व्यापाऱ्याचे सोंग घेऊन दारूची मेजवानी ठेवली आणि फसवणुकीने किल्ल्याचा ताबा घेतला.
दगडी बांधकाम (१६ वे शतक): नंतर वजीर मलिक अंबरने लाकडी किल्ल्याच्या जागी मजबूत दगडी बांधकाम केले आणि जंजिरा सिद्दी घराण्याचा अजिंक्य गड ठरला.
सिद्दी:-
आफ्रिकन वंशज: सिद्दी हे मूळचे आफ्रिकेतील अबीसीनिया प्रदेशातील होते. ते व्यापारी, सैनिक आणि खलाशी म्हणून भारतात आले आणि हळूहळू त्यांनी सत्ता प्रस्थापित केली.
स्वतंत्र राज्य: ताकद वाढवत त्यांनी जंजिरा केंद्रस्थानी ठेवून स्वतंत्र राज्य उभारले आणि शत्रूंच्या हल्ल्यांना समर्थपणे तोंड दिले.
मुघलांशी युती: मराठ्यांचा धोका ओळखून त्यांनी मुघलांशी हातमिळवणी केली, ज्यामुळे किल्ल्याचे संरक्षण आणखी बळकट झाले.
मराठ्यांशी संघर्ष
छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रयत्न: शिवाजी महाराजांनी अनेक वेळा जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला, पण यश मिळाले नाही. त्यासाठीच १६७६ मध्ये जंजिऱ्याजवळ पद्मदुर्ग बांधला.
छत्रपती संभाजी महाराजांचा वेढा (१६८२): संभाजी महाराजांनी जंजिरा वेढला आणि काही नुकसानही केले, पण मुघलांच्या आक्रमणामुळे माघार घ्यावी लागली. पेशवा बाजीराव पहिला (१७३३): बाजीरावांनी जंजिऱ्याभोवतालचा बराचसा प्रदेश जिंकला, मात्र किल्ला त्यांच्या ताब्यात आला नाही.
ब्रिटिश राजवट आणि आधुनिक काळ
संस्थान: ब्रिटिशांच्या काळात जंजिरा एक संस्थान बनले आणि येथील शासकांना “नवाब” ही पदवी मिळाली.
भारतात विलीनीकरण: १९४८ मध्ये स्वातंत्र्यानंतर हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झाले.